Ad will apear here
Next
सहासष्टाव्या कलेचे जादूगार
पूर्वापार माहीत असलेल्या ६४ कलांव्यतिरिक्त जाहिरात/सिनेमा ही ६५वी कला आहे आणि ‘थीम पार्क’ या आधुनिक आविष्काराला ६६वी कला मानलं गेलंय! ‘थीम पार्क’मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावून इंग्लंड, डेन्मार्क, प्राग, जपानसारख्या देशांमध्ये काम करणारे, तसेच सिनेमा संकलन आणि माध्यम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणारे, भारतातल्या डिजिटली एडिट झालेल्या पहिल्या फिल्मचे एडिटर म्हणजे संजय दाबके. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत...
.............
- सिनेक्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? आणि तुम्ही याच क्षेत्राकडे कसे ओढले गेलात?
- मला अगदी लहानपणीच सिनेमाची आवड निर्माण झाली. याचं एक कारण म्हणजे आम्ही पुण्यात प्रभात टॉकिजच्या अगदी समोरच राहायचो. त्यामुळे तिथे काम करणारे सर्व जण चांगलेच ओळखीचे होते. अगदी डोअरकीपर आणि बाहेर तिकिटं ब्लॅकमध्ये विकणाऱ्यांपासून ते प्रोजेक्शन रूममध्ये रिळं चढवणाऱ्यापर्यंतच्या सगळ्यांचा त्यात समावेश होता. हळूहळू मला प्रोजेक्शन रूममध्ये प्रवेश मिळत गेला आणि तिथली ती सर्व प्रक्रिया आवडत गेली. मला तांत्रिक गोष्टी आवडत होत्या. त्यामुळे पडद्यामागचं तंत्रज्ञान पाहायला मिळतंय, हे फीलिंग भारी असायचं. मग ती रिळं लावणं, फिल्म तुटली तर ती जोडणं हे मी अगदी सातवी-आठवीत असल्यापासून पाहून शिकत गेलो. त्या वेळी ‘भानुविलास’मध्ये प्रोजेक्शन रूममध्ये काम करणारा एक जण आमच्या वाड्यात यायचा. त्याच्याशी चांगली ओळख झाली होती. नंतर मी घरीच एक छोटा प्रोजेक्टर बनवला होता, त्याच्यावर काही फिल्मचे तुकडे किंवा जाहिरातींचे तुकडे वगैरे लावून ते पडद्यावर मित्रांना दाखवायचो.
 
- पण मग हे तुकडे मिळायचे कुठून? 
- प्रभात आणि ‘भानुविलास’मधली वाया गेलेली फिल्म किंवा खराब रिळातले कापून टाकलेले तुकडे मी मिळवायचो. कधी गाण्याची क्लिप, तर कधी मारामारीची क्लिप असायची. त्याचे शोज मी करायचो. ग्लायकोडिनच्या जाहिरातीचा तुकडा, पिंजरा सिनेमाच्या सर्टिफिकेटचा तुकडा असं काहीही त्यात असायचं. माझ्या आठवी-नववीच्या काळात तर मी ‘भानुविलास’मध्ये संध्याकाळी सहाचे शोज स्वतः प्रोजेक्शन रूममधून ऑपरेट केलेत. त्या कामाचा भाग म्हणून ‘जय संतोषी माँ’ आणि ‘अभिमान’ हे दोनच सिनेमे मी वर्षभर पाहत होतो! तिथूनही काही तुकडे मिळायचे, अगदी कानडी सिनेमांचेसुद्धा. तेही घरच्या प्रोजेक्टरसाठी वापरायचो. 

- या क्षेत्रात शिरण्यासाठी आवश्यक असं शिक्षण किंवा प्रशिक्षण कुठे घेतलंत?
- घरची परिस्थिती अशी नव्हती, की मी ‘एफटीआयआय’ला अॅडमिशन घेऊ शकेन. मग सरळ बीएस्सी झालो; पण माझ्या सुदैवाने त्या वर्षी १९८४-८५ दरम्यान पुणे युनिव्हर्सिटीत ‘ब्रॉडकास्टिंग इंजिनीअरिंग’चा एक वर्षाचा कोर्स सुरू झाला. त्याच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं; पण मला ते फारच ग्रेट वाटलं आणि मला अॅडमिशनही मिळाली. (तो कोर्स माझ्या शिक्षणानंतर बंद पडला.) तो काळ म्हणजे जेमतेम रंगीत टीव्ही बाजारात येण्याचा आणि संपूर्ण कलर ब्रॉडकास्टिंग सुरूही व्हायचं होतं. माझ्या सुदैवाने त्या कोर्ससाठी आम्हाला सोनीकडून आलेली कलर इक्विपमेंट्सची पहिली बॅच हाताळायला मिळाली. अगदी सर्व प्रोफेशनल कॅमेरे, व्हीटीआर वगैरे उपकरणं त्यात होते. त्यामुळे त्यावर मनसोक्त हात चालवून सर्व शिकायला मिळालं. मॅन्युअल वाचत आम्ही २४-२४ तास तिथे सर्व शिकलो. ‘हँड्स ऑन’ म्हणतात, तसं महत्त्वाचं सर्व शिक्षण तिथं झालं. 

- तो पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा होता का?
- हो. ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंगचा (अॅप्लाइड टेक्नॉलॉजी) डिप्लोमा! त्या वेळी मुंबई दूरदर्शनवरून विजया जोगळेकर, विनय धुमाळे आणि काही इंजिनीअर्स शिकवायला यायचे. त्या काळात भारतात कलर शूटिंगचे कॅमेरे दुरुस्त करू शकणाऱ्या फार थोड्या लोकांत मी एक झालो होतो. 

- एडिटिंगचं शिक्षण कुठे घेतलं?
- त्या काळी फिल्म एडिटिंगची मेकॅनिकल प्रोसेस होती, फिल्म कापून एडिट करायची. आम्ही इलेक्ट्रॉनिक एडिटिंग शिकलो. त्या वेळी मला असलेल्या तांत्रिक ज्ञानामुळे मी ते सहजच शिकलो. आणि ‘एडिटिंग’ सुरू केलं. त्या वेळी दूरदर्शनसाठी खासगी स्टुडिओमधून मी एडिटिंगची अनेक कामं केली. अनेक मराठी , हिंदी सीरियल्सचं एडिटिंग केलं. त्याच दरम्यान मला ‘बीबीसी’ची फेलोशिप मिळाली आणि मी लंडनला ‘बीबीसी वर्ल्ड’च्या स्टुडिओत गेलो. १९९२च्या दरम्यान त्यांच्या नवीन ‘सेटअप’मध्ये काम करायची संधी मला मिळाली. पुढे ९४-९५ साली मला फुलब्राइट स्कॉलरशिप मिळाली ती कम्युनिकेशन विषयातल्या एमएस्सीसाठी आणि मी अमेरिकेला गेलो. तिथे मला एडिटिंग आणि इतर टेक्निकल गोष्टींबरोबरच ‘टेलिव्हिजन प्रोग्रामिंग’ हा विषय पूर्णपणे वर्षभर शिकायला मिळाला, जे भारतात कुठेच शिकायला मिळत नव्हतं. त्याचं संपूर्ण शास्त्र, अॅड कशा चालतात, सकाळी काय, दुपारी काय, प्रोगॅम कसे अॅडजस्ट करायचे वगैरे वगैरे. तो कोर्स संपवून मी भारतात आलो आणि ‘बार्स अँड टोन’ ही स्वतःची कंपनी चालू केली. शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन सर्व्हिसेस, एडिटिंग वगैरे आम्ही द्यायचो. त्या वेळी महेश कोठारे टेलिव्हिजनसाठी काही काम करत होते. त्यांच्यासाठी एडिटिंगचं काम मी केलं. असं करता करता मी त्यांच्या पहिल्या फिल्मसाठी ‘डिजिटल एडिटिंग’ केलं. त्या वेळी ‘हेव्हीवर्क्स’ नावाचं सुंदर मशीन असायचं, त्याच्यावर ती काम करायचो. 

- म्हणजे भारतातल्या पहिल्या डिजिटली एडिट केलेल्या फिल्मचे एडिटर तुम्ही आहात तर! मग ‘डिजिटल एडिटिंग आणि संजय दाबके’ अशी जोडीच जमली म्हणायची?  
- हो. म्हणजे माझ्या सुदैवाने मला तशी संधी मिळाली आणि पुढे मी डिजिटल एडिटिंगमध्ये भरपूर काम केलं. आणि त्याचाच भाग म्हणून ‘डिजिटल स्पेशल इफेक्ट्स फॉर स्टोरीटेलिंग’ हा प्रकारसुद्धा मी महेश कोठारे यांच्याच ‘पछाडलेला’ या सिनेमासाठी भारतात सर्वप्रथम वापरला. त्याच्यानंतर ‘५.१  सराउंड साउंड मिक्स’ मी ‘चिमणी पाखरं’साठी सर्वप्रथम वापरला. 

- या संदर्भातल्या काही इंटरेस्टिंग आठवणी सांगा.  तुमचे आवडते संकलक कोण?
- भक्ती बर्वेसारख्या महान अभिनेत्रीबरोबर एडिटिंगचं काम करता आलं, त्याच्या आठवणी आहेत. विनायक चासकर यांचं मार्गदर्शन मला लाभलंय. हिंदीमधले प्रख्यात संकलक एम. एस. शिंदे, मराठीतले ग्रेट संकलक एन. एस. वैद्य अशा अनेकांकडून मला शिकायला मिळालं. त्यांचं काम आवडतं. 

- फिल्ममधून टीव्हीकडे वळलात?
- २००४च्या दरम्यान मला ‘ई-टीव्ही’कडून बोलावणं आलं. मराठी चॅनेल हेड म्हणून एक वर्षासाठी मी हैदराबादला गेलो होतो. 

- मग थीम पार्क या संकल्पनेकडे कसे आलात? ही संकल्पना काय असते? 
- ज्या दिवशी मी ‘ई-टीव्ही’ सोडून निघणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी मला रामोजी स्टुडिओच्या जालनापूरकर साहेबांकडून बोलावणं आलं आणि त्यानुसार मी पुढचं वर्षभर तिथल्या सिम्युलेटर राइड्सची कामं केली. पहिला ‘इंटरअॅक्टिव्ह शो’ केला. त्यादरम्यान मला जाणवलं, की आता ‘थीम पार्क’ हेच आपलं पॅशन आणि कार्यक्षेत्र राहील. आणि अशा तऱ्हेनं मी या ६६व्या कलेकडे ओढला गेलो. गेली आठ-दहा वर्षं मी याच क्षेत्रात पुष्कळ काम करतोय. थीम पार्क म्हटलं, की त्यात रोलर कोस्टर राइड, डार्क राइड, कॅरुसाल यांच्याबरोबर स्टोरीटेलिंग हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे क्रिएटिव्हिटीला प्रचंड वाव असतो. आणि मी ते काम एन्जॉय करतोय. 

- परदेशात कुठे कुठे तुम्ही कामं केली आहेत? आणि भारतात?
- डेन्मार्क, प्राग, इंग्लंड या ठिकाणी मी कामं केली आहेत. जपानमध्ये नुकताच जगातला सर्वांत वेगवान रोलरकोस्टर सुरू झालाय. त्याच्या लॉबीचं डिझाईन आम्ही केलंय. भारतात बाबासाहेबांबरोबर शिवसृष्टीसंदर्भात काम सुरू आहे. हैदराबादमधल्या संत भगवद् रामानुज यांच्या हजाराव्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतीपार्कचं काम चालू आहे, तिथल्या थीम पार्क डिझाइनचं काम मी करतोय. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या म्युझियमचं काम करतोय. आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळतंय त्याचं समाधान आहे. 

(संजय दाबके यांचे मनोगत आणि त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अद्भुत थीम पार्कची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... बके यांच्या डेन्मार्क इथल्या कामाची झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSKBL
Similar Posts
‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ ‘माध्यमं आणि सोशल मीडियात नकारात्मकतेचं प्रमाण अधिक असलं, तरी आपल्याला भेटणारी बहुतांश माणसं आणि येणारे अनेक अनुभव सकारात्मकच असतात. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं,’ असं सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका, प्रवासवर्णनकार आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांना वाटतं
कलावंतांनी कलावंतांसाठी केलेलं ‘कलापूर’ पुण्याहून पौड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या दिशेला एक बाण आपल्याला ‘मिस्टिक व्हिलेज’ नावाची पाटी दाखवतो. त्या रस्त्याने गेल्यावर तिथेच ‘सुंबरान’ नावाचं एक अद्भुत ठिकाण आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांच्या कलासक्त मनाने आणि नजरेने त्या
‘तीन दशकांचं, दृढ होत जाणारं नातं’ ‘गंधर्व’ला नाटक करणं हे जणू एक स्टेटस सिम्बॉल असल्यासारखं असायचं!....’ ही भावना आहे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची. ‘बालगंधर्व’च्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्यानं त्यांची भेट घेतली असता, त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला, या नाट्यगृहाची वैशिष्ट्यंही सांगितली आणि तीन दशकांहून अधिक काळ या नाट्यगृहाशी
सर्जनशील अनुवादक ‘पॅपिलॉन’सारखे एकाहून एक सरस अनुवाद करून गेली ४० वर्षे मराठी वाचकांना वेगळी साहित्यिक मेजवानी देणारे ज्येष्ठ अनुवादक म्हणजे रवींद्र गुर्जर. आपल्या या योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा, अशी भूमिका मांडून त्यांनी आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language